ज्ञानदेवांची अभंग गाथा

Devachiye Dwari

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥

Ranga Yei Wo Yei

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं

रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं।
विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी ।
तुझा वेधु माझे मनी ॥२॥

कटी कर विराजित मुगूट रत्‍न जडित ।
पीतांबरू कसिला तैसा येऊ का धांवत ॥३॥

विश्व-रूपे विश्वं-भरे कमल-नयनें कमलाकरे वो ।
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥

Runuzunu Runuzunu Re

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥

Awachita Parimalu

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कासे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥

Ghanu Waje Ghunaghuna

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥१॥

चांदु वो चांदणे । चांपेवो चंदनु ।
देवकीनंदनु । वीण अणू नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्या उत्तरे ।
कोकिळें वर्जवें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥

दर्पणी पाहतां । रूप न दिसे आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें । विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥

Pail To Ge Kau Kokatahe

पैल तो गे काऊ कोकताहे

पैल तो गे काऊ कोकताहे।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डाहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

Om Namoji Adya

नमोजी आद्या

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ।
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥

अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥

हे तिन्ही एकवटले । तेथें शब्द्ब्रम्ह कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ॥
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥

Mogara Fulala Mogara Fulala

मोगरा फुलला मोगरा फुलला

इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥१॥

मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां अतिभारू कळियांसी आला ॥२॥

मनाचिये गुंती गुंइफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥

Vishwache Art Mani Prakashale

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले।
अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।

हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥

Aji Soniyacha Dinu

अजि सोनियाचा दिनु

अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥